एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नागदुली गावात देशी, विदेशी तसेच गावठी दारूची अवैध विक्री सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी एरंडोल पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. गावातील शांतता, सुव्यवस्था आणि तरुण पिढीवर होणाऱ्या परिणामांचा दाखला देत ही अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नागदुली गावाचे पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे प्रशासक तसेच ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने एरंडोल पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या तक्रारीत गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे देशी, विदेशी आणि हातभट्टी दारूची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावालगत असलेल्या काही अनधिकृत हॉटेल्स तसेच रस्त्यालगतच्या परिसरात दिवस-रात्र सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या वाढली असून अनेकदा वाद, भांडणे आणि सामाजिक वातावरण बिघडण्याच्या घटना घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून अशाच प्रकारे अवैध दारू विक्री सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीही महिला व पुरुष ग्रामस्थांनी पोलिसांकडे धाव घेतली होती, मात्र अपेक्षित कठोर कारवाई न झाल्याने संबंधितांकडून पुन्हा हा व्यवसाय सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्रीमुळे गावातील तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अनेक कुटुंबांवर याचा विपरीत परिणाम होत असून आर्थिक नुकसान, कौटुंबिक तणाव आणि सामाजिक समस्या वाढत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
गावातील महिला व नागरिकांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढून पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर प्रशासक निर्मलाबाई माळी, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा अहिरे, पोलीस पाटील मनोज पाटील, तलाठी अंकीत कसोदे, विष्णू सपकाळे, रोहिदास पाटील, शाकीर खाटीक, सुनील माळी, मीराबाई भिल, इंदुबाई कोळी, अरुणाबाई कोळी, प्रमिला कोळी, निर्जलबाई कोळी, यमुनाबाई कोळी, विजया कोळी, नारायण पाटील, भागवत पाटील, गोलू पाटील, खुशाल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
दरम्यान, या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे नागदुली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. गावातील शांतता आणि तरुण पिढीचे भवितव्य लक्षात घेऊन अवैध दारू विक्रीवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.



