Home Cities जामनेर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर आंदोलन! शेतकऱ्यांचा वनविभागाला इशारा

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर आंदोलन! शेतकऱ्यांचा वनविभागाला इशारा

0
19

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. उभी पिके वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर भागपूर, नशिराबाद, बेळी, वराडसीम, चिंचोली, शिरसोली, उमाळा, देव्हारी, कंडारी, असोदा, भादली, कडगाव आणि शेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आज जळगाव भागाचे उपवनसंरक्षक यांना निवेदन देत वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.

वर्षभर अहोरात्र मेहनत करून शेतकरी पिके उभी करतात. मात्र रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडांच्या कळपांकडून शेतात घुसून पिकांची नासधूस केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी शेतात जागरण करावे लागत असून, त्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच वन्यप्राण्यांचा सर्वाधिक उपद्रव असलेल्या गावांमध्ये वनविभागाची विशेष पथके तैनात करून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर कुंपणासाठी आर्थिक मदत आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. वन्यप्राण्यांमुळे मानवी जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल, अशी प्रभावी संपर्क यंत्रणाही उभारावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रशासनाने केवळ कागदोपत्री आश्वासने न देता संबंधित गावांतील शेतकरी आणि वन अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करावा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

यावेळी प्रकाश नारखेडे, किशोर पाटील, सुपाडू रोटे, अभिलाष पाटील यांच्यासह भागपूर, नशिराबाद, बेळी, वराडसीम, चिंचोली, शिरसोली, उमाळा, देव्हारी, कंडारी, असोदा, भादली, कडगाव, शेळगाव परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. वनविभागाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त आणि नुकसानीची भरपाई याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound