पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वराज्य ऑटो गॅरेज येथून ७७ हजार ५०० रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीला पाचोरा पोलिसांनी मध्य प्रदेशातून जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली संपूर्ण ७७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली असून, या कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
ही घटना १९ ऑगस्ट २०२६ रोजी घडली. फिर्यादी दिनेश निलेश सोनवणे (वय ३०, रा. बनोटी, ता. सोयगाव) हे पाचोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. बँकेत गर्दी असल्याने ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील स्वराज्य ऑटो गॅरेज येथे गेले. गॅरेजमध्ये वाहनाचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्याने नजर चुकवून ७७,५०० रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली.

याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तपासाला वेग दिला.
गुन्हे शोध पथकाने बँक परिसरातील तसेच घटनास्थळाच्या आसपासचे CCTV फुटेज बारकाईने तपासले. या फुटेजमध्ये काही संशयित व्यक्ती बँकेपासून स्वराज्य ऑटो गॅरेजपर्यंत फिर्यादीचा पाठलाग करताना आढळून आले. त्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सांसी कडिया येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री झाल्यानंतर पाचोरा पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन MP राबवत तपास पथक मध्य प्रदेशात रवाना केले. स्थानिक बोडा पोलीस ठाण्याच्या मदतीने ३ ऑक्टोबर रोजी अतिसंवेदनशील सांसी कडिया गावात अचानक कारवाई करण्यात आली. या कारवाईत रितीक राजाराम सिसोदीया याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण ७७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. परराज्यात जाऊन केलेल्या या कारवाईमुळे पाचोरा पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.
या कारवाईत पोहेकॉ उमेश पाटील, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ हरीश परदेशी आणि पोकॉ श्रीराम शिंपी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोहेकॉ राहुल शिंपी करीत आहेत.



