Home Cities यावल यावल तालुका काँग्रेस आक्रमक; विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

यावल तालुका काँग्रेस आक्रमक; विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

0
11

यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना गुरुवारी निवेदन सादर करण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक सध्या अनेक अडचणींना सामोरे जात असून त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.

याशिवाय बागायतदार शेतकऱ्यांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये सरसकट मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी योजना तातडीने लागू करावी तसेच बंद पडलेली १ रुपयातील पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी, यावरही निवेदनात भर देण्यात आला आहे.

प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर बोट ठेवताना घोटाळेबाज ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून एस.आय.आर. (S.I.R.) मधील जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जलजीवन मिशन योजनेतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.

या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने त्वरित सकारात्मक पावले न उचलल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिला आहे. निवेदनांवर काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष मोहम्मद हकीम शेख, लीलाधर चौधरी, शेख नईम शेख शरीफ, सुनील पाटील, अभय महाजन , कमल तडवी, मो. हकीम शेख , करीम मन्यार, टिनू सोनार , माजी नगरसेवक सय्यद युनुस, धीरज कुरकुरे, शरद पाटील , चंद्रकांत चौधरी, किरण सोनवणे, सरफराज पिंजारी आदींची स्वाक्षरी आहे.


Protected Content

Play sound