चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला चोपडा पोलिसांच्या पथकाने गजाआड केले आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड (पुणे) परिसरात विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या काही गुन्हेगारांनी चोपडा शहरात येऊन दरोड्याची तयारी सुरू केली होती. परंतु चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांची योजना उधळली गेली आणि वेळेवर केलेल्या कारवाईत त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक 25 जून 2025 रोजी रात्री पोलिस निरीक्षक मयूर माळी यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पथकासह तात्काळ कारवाई केली. या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, वाहने, मोबाइल, तसेच गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही टोळी पुणे परिसरात जबरी चोरी, घरफोडी, खून, मारामारी, ॲट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होती. यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. तर अन्य आरोपींमध्ये तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे रा. निगडी, विनोद राकेश पवार रा. चिंचवड आणि सुनील गोरख जाधव रा. चिंचवड यांचा समावेश आहे.
या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून चोपडा तालुक्यात दरोडा टाकण्यासाठी ते आले होते. तथापि चोपडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. डी. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सूचनेनुसार ही संपूर्ण मोहीम पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, दिपक विसावे, जितेंद्र सोनवणे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, लक्ष्मण शिंगाणे, हर्षल पाटील, महेंद्र साळुंखे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, गजेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली.