जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये, पोदार इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई), जळगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पवन एच. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या कायद्यांची सखोल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन एच. बनसोड, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. गोकुळ मंसाराम महाजन, लोकअभिरक्षक कार्यालयाच्या सहायक अॅड. श्रीमती शिल्पा व्ही. रावेरकर, आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शांता वाणी उपस्थित होत्या.
उपस्थितांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये “मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९” आणि “६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक हक्कांविषयी” माहिती देण्यात आली. तसेच, “अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत हक्कांशी संबंधित मुद्दे”, “लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोस्को)”, “प्रदूषणमुक्त पाणी आणि हवेचा अधिकार, वाजवी निवास्थानाचा अधिकार व अन्नाचा अधिकार” यांसारख्या मूलभूत मानवी हक्कांवरही प्रकाश टाकण्यात आला. “कायदेशीर जागरूकता पद्धती व त्याचे फायदे”, “नागरिकांची मूलभूत कर्तव्ये” आणि “अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरोधी कायदा” आदी वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अंकिता मुंदडा यांनी केले. यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे इतर प्रशासकीय अधिकारी, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संतोष तायडे, राहुल साळुंखे, तेजस जगताप, जितेंद्र भोळे यांनी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी अनमोल सहकार्य केले. या जनजागृती शिबिरामुळे विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळाल्याने भविष्यात ते अधिक जागरूक नागरिक बनण्यास मदत होईल.