जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथील गी.द.म. कला, के.रा.न. वाणिज्य व म.धा. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा दिनेश चव्हाण हिने क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. श्री जे.जे.टी. विश्वविद्यालय, झुंझुनू, राजस्थान येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धा (२०२४-२०२५) मध्ये हर्षदाने सुवर्णपदक पटकावले आहे. जामनेर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून, अखिल भारतीय स्तरावरील आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी हर्षदा ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. त्यामुळे तिचे हे यश केवळ उल्लेखनीय नसून, ते भविष्यातील खेळाडूंसाठी पथदर्शक ठरणार आहे.
या प्रतिष्ठेच्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी जामनेर महाविद्यालयातून एकूण चार खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या हर्षदा दिनेश चव्हाण सोबत सोहम राजेश पवार, शंकर मंगलसिंग राजपूत आणि कोमल राजू भोई यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंनी यापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतर विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या या प्रभावी कामगिरीमुळेच त्यांना राजस्थानमधील या अखिल भारतीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. नवनीत आसी यांचे सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन लाभले.
हर्षदा चव्हाणच्या या ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या यशाबद्दल आणि तिच्यासोबत राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र खडायते, उपप्राचार्य प्रा. डी. एस. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अरविंद राऊत, क्रीडा संचालक प्रा. डॉ. नवनीत आसी, डॉ. किरण पाटील, प्रा. देवा पाटील तसेच महाविद्यालयाच्या इतर सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हर्षदाच्या या यशाने जामनेर महाविद्यालयाचे नाव संपूर्ण देशात उज्वल झाले आहे.