Home Cities जळगाव उन्हाच्या तडाख्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; एसटी वर्कशॉपजवळ आढळला मृतदेह

उन्हाच्या तडाख्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; एसटी वर्कशॉपजवळ आढळला मृतदेह


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. तुकारामवाडी येथील ६० वर्षीय वृद्धाचा उन्हाच्या फटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून एसटी वर्कशॉपजवळील भिंतीलगत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

लोधू नामदेव पाटील (वय ६०, रा. हिंगणे ता. बोदवड, ह.मु. तुकारामवाडी, नेरीनाका, जळगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते एमआयडीसीतील दालमिल कंपनीत कामाला होते. पत्नीसह ते तुकारामवाडीत वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघे शनिवारी मूळगावी गेले होते. रविवारी सायंकाळी लग्न आटोपल्यानंतर ते बसने जळगावात परतले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास नेरीनाका परिसरातील एसटी वर्कशॉपजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

एमआयडीसीकडे जाणाऱ्या काही कामगारांनी त्यांची ओळख पटविल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.

जिल्ह्यात रविवारी तापमान ४४ अंशांवर गेल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोधू पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound