रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षणासोबतच मुलींनी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असून, स्वतः सक्षम बनून इतर महिलांनाही आत्मविश्वास देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी केले. रायगड येथे झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मर्दानी खेळांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून रावेरचे नाव राज्यभर पोहोचविणाऱ्या ‘रणरागिणी’ ग्रुपचा गौरव सोहळा रावेर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
रावेर येथील दत्तगुरु लॉन्स येथे माऊली फाउंडेशनच्या वतीने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेरच्या परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्रीमती दीपा जेधे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, तहसीलदार संजय तायडे आणि प्रवीण पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन दीपा जेधे आणि डॉ. योगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रायगड येथे मर्दानी खेळांचे सादरीकरण करून रावेर तालुक्याचा गौरव वाढविणाऱ्या रणरागिणी ग्रुपमधील विद्यार्थिनी आणि पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डीवायएसपी अनिल बडगुजर म्हणाले की, आजच्या काळात मुलींनी केवळ शिक्षणात प्रगती न करता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम होणे आवश्यक आहे. आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतल्याने आत्मविश्वास वाढतो आणि संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करता येते. रणरागिणी ग्रुपमधील विद्यार्थिनींनी इतर महिलांसाठी प्रेरणादायी कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून विविध मर्दानी खेळांच्या पथकांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये रावेर येथील रणरागिणी ग्रुपला विशेष मान मिळाला होता. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत माऊली फाउंडेशनच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, रायगडावर जाऊन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या रावेर तालुक्यातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा गौरव करणे आवश्यक वाटले. या कार्यक्रमामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि पारंपरिक मर्दानी खेळांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या गौरव सोहळ्यात प्रशिक्षक परी जीवन महाजन, कोच जीवन सुभाष महाजन तसेच खेळाडू खुश परदेशी, पवन जीवन महाजन, सार्थक विनोद महाजन, तेजस्विनी अंबादास महाजन, चैताली विनोद शिंदे, मीनल संतोष महाजन, निशु ईश्वर महाजन, खुशी कैलास महाजन, मृणाल ईश्वर महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय चिनावल शाखा चालविणाऱ्या भावना ताई सरोदे, अर्चना ताई सरोदे, युतिका नेमाडे तसेच रसलपूर शाखेच्या चैताली महाजन, वैष्णवी महाजन आणि रीना चौधरी यांचाही गौरव करण्यात आला.
रावेर शहरात महात्मा फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची प्रतिकृती साकार करणाऱ्या स्वरा रवी महाजन आणि वेदांत संतोष पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.



