…तर वेतन वाढीवरही विचार करणार : अनिल परब यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी | वेतन वाढ करूनही जर संप कायम राहत असेल तर आम्ही एसटी कर्मचार्‍यांना दिलेल्या वेतनवाढीवर विचार करू असा सूचक इशारा आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. कर्मचारी कृती समितीशी नव्याने बोलणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात घसघशीत वाढ करून देखील राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही कायम आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचारी कृती समितीशी सविस्तर चर्चा केली. यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीबाबतची माहिती दिली.

अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांचा संप दीर्घ काळपर्यंत चालणे हे कुणालाही परवडणारे नाही. यासाठीच आम्ही कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात चांगल्या प्रमाणात वाढ केलेली आहे. तर, विलीनीकरणाचा निर्णय आमच्या हातात नाही. तरी कोर्टाने निर्देश दिल्यास यावर देखील विचार करता येईल. दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. आणि त्यांच्या कराराची मुदत दहा वर्षे करावी या मागण्या देखील समोर आल्या असून यावर विचार होऊ शकतो. मात्र कर्मचारी अजूनही संपावर अडून बसल्याची बाब दुर्दैवी आहे.

परब पुढे म्हणाले की, वेतनवाढ देऊनही जर संप मिटत नसेल तर आम्ही ही वाढ मागे देखील घेऊ शकतो. कामावर न येणार्‍या कर्मचार्‍यांवरील कारवाई देखील आता अधिक कठोरपणे करण्यात येईल. तर अलीकडेच नियुक्ती झालेल्यांना तात्काळ रूजू करून घेत बस सेवा सुरू करण्याचे प्रयत्न देखील करता येतील असे अनिल परब म्हणाले.

Protected Content