Home Cities चोपडा अडावद येथे उद्या भव्य ‘महाराजस्व समाधान शिबीर’

अडावद येथे उद्या भव्य ‘महाराजस्व समाधान शिबीर’

0
3

अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात सुरू असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत रविवारी (२६ जुलै) अडावद येथे भव्य महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, अडावद, धानोरा आणि चोपडा परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विधानसभा मतदारसंघनिहाय हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अडावद येथील माळी समाज मंगल कार्यालय, मधला माळी वाडा येथे रविवारी सकाळी १० वाजता शिबिरास सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत समिती, भूमी अभिलेख, महावितरण यांसह विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक दाखले, अर्ज प्रक्रिया तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळणार असल्याने त्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे.

याशिवाय शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांबाबत नवीन लाभार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. अर्ज भरण्यापासून ते मंजुरी मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया संबंधित विभागांचे अधिकारी आणि तज्ज्ञ समजावून सांगणार आहेत. त्यामुळे योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक नागरिकांच्या शंकांचे तत्काळ निरसन होणार असून अधिकाधिक लाभार्थी शासनाच्या योजनांशी जोडले जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अडावद, धानोरा आणि चोपडा विधानसभा मतदारसंघातील नागरिक, महिला, युवक तसेच शेतकरी बांधवांनी रविवारी सकाळी १० वाजता शिबिरस्थळी वेळेत उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या दारापर्यंत प्रशासन पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound