Home Cities जळगाव आषाढी एकादशीला समाजसेवेची सुंदर परंपरा; रुग्णालयातील नातेवाईकांसाठी उपवासाचा आहार

आषाढी एकादशीला समाजसेवेची सुंदर परंपरा; रुग्णालयातील नातेवाईकांसाठी उपवासाचा आहार

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि भक्तिमय दिवस मानला जातो. या दिवशी लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीत तल्लीन होत उपवास, नामस्मरण आणि आराधना करतात. उपवास करणाऱ्या भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान राखत जळगाव येथील साई इच्छा फाउंडेशनने समाजसेवेचा आदर्शवत उपक्रम राबवत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना पौष्टिक उपवासाचा आहार वाटप केला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने साई इच्छा फाउंडेशनच्या वतीने सुमारे ४० किलो भगर आणि आमटी तयार करून उपवास करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वाटप करण्यात आले. यासोबतच खजूर आणि दूधही देण्यात आले. रुग्णालयात अनेक नातेवाईक रुग्णांच्या सेवेसाठी दिवसरात्र थांबलेले असतात. त्यापैकी अनेकजण आषाढी एकादशीचा उपवास पाळत असल्याने त्यांच्या उपवासात कोणताही खंड पडू नये आणि त्यांना आरोग्यदायी व पोषक आहार मिळावा, या उद्देशाने हा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक व वस्तूरूपाने मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर भगर, आमटी, खजूर आणि दूधाचे वितरण शक्य झाले. रुग्णालय परिसरात या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. उपवासधारकांनी फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी साई इच्छा फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपाली शिरापुरे, सचिव आनंद शिरापुरे, डब्ल्यू. पी. जोशी, कस्तुरी शिरापुरे तसेच फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी वाटप उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी रुग्णालयातील विविध विभागांमध्ये जाऊन उपवासधारकांपर्यंत आहार पोहोचविला.

 


Protected Content

Play sound