Home Cities जळगाव हरिनामाच्या गजरात ज्येष्ठांचा सन्मान; आषाढी एकादशीला एनसीएमसी कार्डचे वाटप

हरिनामाच्या गजरात ज्येष्ठांचा सन्मान; आषाढी एकादशीला एनसीएमसी कार्डचे वाटप

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव शहरातील ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित ‘वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघा’च्या वतीने भक्ती, संस्कार आणि समाजसेवेचा संगम घडविणारा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जळगाव रोडवरील रामदेव बाबा योग हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात भव्य भजन-कीर्तनाचा मेळावा, ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस आणि एनसीएमसी (National Common Mobility Card) वाटप अशा विविध उपक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात माऊली भजनी मंडळाच्या वारकरी मंडळींनी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला. टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या घोषाने रामदेव बाबा योग हॉलमध्ये उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. परिसरातील अनेक भाविक, ज्येष्ठ नागरिक आणि सभासदांनी या भजन-कीर्तनाचा मनःपूर्वक लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, चालू महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा संघातर्फे सामूहिक सन्मान करण्यात आला. आधुनिक पद्धतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याऐवजी संतांच्या भूमीत भजन-कीर्तनाच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आध्यात्मिक वातावरणात वाढदिवस साजरा करण्याची अनोखी परंपरा जपण्यात आली. यावेळी संजीव चौधरी, हरी पाटील, रमेश पाटील, रत्नप्रभा बोरॉले, राजेश सावळे, विकास राणे, ज्योती चौधरी आदी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून स्वागत करत संघटनेच्या सामाजिक विचारांचे कौतुक केले.

धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देत संघाच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी (National Common Mobility Card) चे वितरण करण्यात आले. सार्वजनिक वाहतुकीत उपयोगी ठरणाऱ्या या डिजिटल कार्डमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास अधिक सुलभ होणार असून विविध सरकारी सुविधांचा लाभ घेणेही सोपे होणार आहे. या उपक्रमामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी संघाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound