यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझीरा-आंबापानी जंगल परिसरात वनविभागाने मध्यरात्री धडक कारवाई करत अवैध बांबू वाहतुकीचा पर्दाफाश केला. या कारवाईत ५५० बांबू आणि सहा मोटारसायकली असा सुमारे १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनविभागाचे पथक पाहताच संबंधित आरोपी मोटारसायकली आणि मुद्देमाल घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या कारवाईमुळे जंगलातील अवैध वृक्षतोड आणि बांबू तस्करी करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम वनपरिक्षेत्राचे कर्मचारी आणि गस्ती पथक २५ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास वाघझीरा राऊंड परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी वाघझीरा ते आंबापानी मार्गावर काही इसम मोटारसायकलीवर मोठ्या प्रमाणात बांबू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. गस्ती पथकाने संबंधित वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकांनी वेगाने पळ काढला. वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असता वाघझीरा गावाजवळ आरोपींनी सहा मोटारसायकली आणि बांबूंचा साठा रस्त्यावरच टाकून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

या कारवाईत ५५० बांबू (अंदाजे किंमत ११ हजार रुपये) आणि सहा मोटारसायकली (अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये) असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल वनविभागाच्या यावल मुख्य वनकेंद्रात पावतीने जमा करण्यात आला असून, या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई सौरिष सहाय (उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगाव), समाधान पाटील (सहाय्यक वनसंरक्षक, दक्षिण यावल) आणि प्रशांत जोशी (वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पश्चिम) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वनपाल तुषार देवरे, वनरक्षक हनुमंत सोनवणे, ए. जी. राठोड, अनिसा तडवी, रवींद्र नगराळे, अक्षय रोकडे तसेच संरक्षण वनमजुरांनी सक्रिय सहभाग घेतला. सातपुडा परिसरात अवैध वृक्षतोड आणि बांबू तस्करी रोखण्यासाठी वनविभागाने गस्त आणि विशेष मोहिमा अधिक तीव्र केल्या असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या धडक कारवाईमुळे वनसंपत्तीची अवैध लूट करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.



