Home Cities यावल यावलमध्ये ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा उत्साहात समारोप 

यावलमध्ये ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा उत्साहात समारोप 

0
1

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘धरती आबा’ क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा समारोप १८ नोव्हेंबर रोजी यावल येथे उत्साहात झाला. यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात आयोजित या समारोप सोहळ्यास रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे उपस्थित होते. ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या सप्ताहातून आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह लाभार्थ्यांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, स्वाभिमान आणि समाजहिताच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थी बंधू-भगिनींचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि सामाजिक अस्मिता यांचे दर्शन घडले.

कार्यक्रमादरम्यान आमदार अमोल जावळे यांनी लाभार्थी बंधू-भगिनींशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांची आणि अपेक्षांची माहिती जाणून घेतली. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या जीवनात विकासाच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. या समारोप सोहळ्यास फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेशाध्यक्ष एम. बी. तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, सरपंच मीना तडवी, भाजपचे यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी आणि यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिकारी जहाँगीर तडवी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे, लाभार्थ्यांचा सन्मान करणे आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.


Protected Content

Play sound