Home क्राईम बोरनारमध्ये लग्न समारंभासाठी आलेल्या तरुणाचा निर्घृण खून; पोलिसांकडून १५ संशयित ताब्यात

बोरनारमध्ये लग्न समारंभासाठी आलेल्या तरुणाचा निर्घृण खून; पोलिसांकडून १५ संशयित ताब्यात

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लग्न समारंभासाठी गावात आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे घडली आहे. प्रेम गोपाल धनगर (वय २१, रा. बोरनार, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, आतापर्यंत १५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रेम गोपाल धनगर हा काही दिवसांपूर्वीच अमळनेर येथून आपल्या मूळ गावी बोरनार येथे एका लग्न समारंभासाठी आला होता. गावात लग्नाची धामधूम सुरू असतानाच, अज्ञात हल्लेखोरांनी प्रेम याला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे बोरनार गावासह जळगाव तालुक्यात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचा समावेश होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जुन्या वादातून किंवा लग्न समारंभातील वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून परिसरातील १५ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.


Protected Content

Play sound