जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील ऑटोरिक्षा चालकांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नसून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) घेतली आहे. याप्रकरणी वायुवेग पथकाला मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे कार्यारंभीन आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश सोळंके यांनी दिले आहेत.
माजी नगरसेवक ॲड. पृथ्वीराज सोनवणे यांनी दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत कार्यालयीन तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी (आदेश क्र. ७४३/आरटीओ/जळगाव/२०२६/जा.क्र. ३१७९) जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे की, जळगाव शहरात ऑटोरिक्षा चालकांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नसून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

या पार्श्वभूमीवर वायुवेग पथक क्रमांक ०२ चे प्रभारी अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक यांना आदेशित करण्यात आले आहे की, तक्रारीतील नमूद प्रकारानुसार जे चालक मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत, अशा वाहनांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार तातडीने कारवाई करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल कार्यालयात सादर करावा. या आदेशाची प्रत तक्रारदार ॲड. पृथ्वीराज सोनवणे यांनाही पाठविण्यात आली आहे.
शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी होत नसल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता आरटीओच्या वायुवेग पथकाकडून अशा रिक्षाचालकांवर नेमकी काय कारवाई होते आणि प्रवाशांना दिलासा मिळतो का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.



