Home Cities जळगाव जळगावकर नाट्यरसिकांसाठी नाट्यप्रयोगांची मेजवानी! २२ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेचा पडदा उघडणार 

जळगावकर नाट्यरसिकांसाठी नाट्यप्रयोगांची मेजवानी! २२ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेचा पडदा उघडणार 

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नाट्यरसिकांसाठी दिवाळीनंतर दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीला रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार आणि इंदूर येथील एकूण १५ नाट्यसंस्था सहभागी होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत.

शहरातील महाकवी कालिदास सभागृह, मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलासमोर, जळगाव येथे ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सहभागी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली असून, कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून नाटकांच्या सादरीकरणाची तयारी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा तसेच रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे. महाराष्ट्राला नाट्यकलेची समृद्ध परंपरा लाभली आहे. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच हौशी कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा राज्य नाट्यस्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमुळे विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संधी मिळते.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार यंदाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीत तीन जिल्ह्यांतील १५ नाट्यसंस्था आपापली नाटके सादर करणार असल्याने स्पर्धेत चुरस पाहायला मिळणार आहे.  यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवर आधारित नाटके सादर होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे, विचारांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. सहभागी संस्थांमधील कलाकारांची मेहनत, दिग्दर्शकांची कल्पकता आणि रंगमंचावरील तांत्रिक कौशल्य यांचा संगम या प्रयोगांतून अनुभवता येणार आहे. हौशी कलाकारांसाठी आपली प्रतिभा सिद्ध करण्याची ही महत्त्वाची संधी ठरणार आहे. दरम्यान, या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना जळगावसह परिसरातील नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


Protected Content

Play sound