जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवा भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महिला शेतकरी सन्मान विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेला “देवा भाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा” शुक्रवारी (२४ जुलै) जळगाव येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय (जीएम फाउंडेशन) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शेकडो महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि शेतीपूरक उपक्रमांना चालना देणारा हा सोहळा ठरला.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेखा वर्मा यांनी केले. महिला शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते. यावेळी महापौर दीपमाल काळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेखा वर्मा यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, सागरदादा बापू, भारती सोनवणे आणि रमेश मोरया आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजूमामा भोळे यांनी शहरी भागातील महिलांसाठी एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपक्रमाची घोषणा केली. घरच्या घरी ‘किचन गार्डन’, ‘टेरेस गार्डन’ किंवा गार्डनिंगच्या माध्यमातून फळे व भाजीपाला पिकविणाऱ्या महिलांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन आणि विशेष स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ₹११,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹७,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹५,००० अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. स्पर्धकांची संख्या वाढल्यास बक्षिसांची संख्या आणि पारितोषिकांची रक्कम वाढविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य वक्ते सागरदादा यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धन, उत्तम आरोग्य आणि आर्थिक बचत या त्रिसूत्रीचा संदेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महिला मोर्चाने केल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर दीपमाला काळे यांनी वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेखा वर्मा यांनी केले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी महिला मोर्चाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सहभागामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे, वैशाली पाटील, आशा चौधरी, जयश्री पाटील, भाग्यश्री चौधरी, उषा पाठक, नंदिनी दर्जी, सरोज पाठक, नीला चौधरी, ज्योती निंभोरे, शोभा कुलकर्णी, माधुरी हांडे, शुभांगी बिराडे यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि शेकडो महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ पदाधिकारी उदय भालेराव, जिल्हा महामंत्री राहुलभाऊ वाघ, नितीन इंगळे, विशाल त्रिपाठी आणि कार्यालय मंत्री प्रकाश पंडित यांनी विशेष सहकार्य केले.
महिला शेतकऱ्यांचा सन्मान, पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन आणि शहरी भागात किचन गार्डन संस्कृती रुजविण्याचा संदेश देणारा “देवा भाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणासह पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



