Home प्रशासन वरणगावात अप्पर तहसील कार्यालयासाठी हालचालींना वेग ; प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल

वरणगावात अप्पर तहसील कार्यालयासाठी हालचालींना वेग ; प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल

0
12

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथे महसूल विभागाचे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मागणीला आता प्रशासकीय पातळीवर महत्त्वाची गती मिळाली आहे. वरणगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या मान्यतेसंदर्भातील प्रस्ताव जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयाकडे पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या मागणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या वरणगाव शहर व परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

ब्रिटिश सत्तेच्या काळात वरणगावला महसुली दर्जाचे महत्त्व प्राप्त होते. परिसरातील अनेक लहान-मोठ्या गावांचा वरणगावशी दैनंदिन संबंध होता. त्या काळात वरणगाव हे महत्त्वाचे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने परिसरातील नागरिकांच्या व्यवहारांचे प्रमुख केंद्र म्हणून त्याची ओळख होती. ब्रिटिश काळात वरणगावला तालुक्याचा दर्जाही होता. मात्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रशासकीय पुनर्रचनेत वरणगावऐवजी भुसावळला तालुक्याचा दर्जा मिळाला.

भुसावळला तालुक्याचा दर्जा मिळाल्यानंतर वरणगाव शहरासह परिसरातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामकाजासाठी भुसावळ येथे जावे लागते. वरणगाव ते भुसावळ हे अंतर सुमारे २० किलोमीटर असल्याने नागरिकांना महसुली कामांसाठी जाण्या-येण्यात वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. विविध दाखले, महसूलविषयक कामे आणि अन्य प्रशासकीय सेवांसाठी वारंवार भुसावळ येथे जावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वरणगाव शहरातील तसेच परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठीचे अंतर कमी व्हावे आणि नागरिकांचा वेळ व पैसा वाचावा, यासाठी वरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.

या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संबंधित मंत्री व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधले. वरणगाव व परिसरातील नागरिकांची प्रशासकीय गैरसोय दूर करण्यासाठी या कार्यालयाची आवश्यकता असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय सावकारे यांनी संबंधित यंत्रणेला वरणगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी वरणगाव येथे महसूल विभागाचे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मान्यतेसंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयाकडे पाठविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या घडामोडीबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. वरणगाव येथे महसूल विभागाचे अप्पर तहसील कार्यालय प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत जनतेच्या या मागणीसाठी शासन आणि प्रशासनाकडे लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास शहरासह परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होईल. नागरिकांना भुसावळपर्यंत वारंवार प्रवास करण्याची गरज कमी होऊन त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्याची शक्यता आहे. तसेच महसुली कामकाज अधिक सुलभ आणि जलद गतीने होण्यास मदत मिळू शकते.


Protected Content

Play sound