रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी पीक विम्याच्या विविध मागण्यांसाठी रावेर तहसील कार्यालयासमोर महात्मा गांधी जयंतीनिमित्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आयोजित केलेले ‘गांधीजी भजन आंदोलन’ यशस्वी झाले. रावेर तालुक्यातील पात्र महसूल मंडळे जाहीर करणे, मंजूर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे आणि विम्यासाठी वगळलेले क्षेत्र नियमित करणे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी एकवटले होते. आंदोलनस्थळी विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी महत्त्वाची माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून तहसील कार्यालयासमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हे भजन आंदोलन करण्यात आले. गांधीजींच्या अहिंसा आणि शांततामय आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे आणि पीक विमा कंपनीचे लक्ष वेधले. तालुकाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. केळी पीक विम्याच्या संदर्भात पात्र महसूल मंडळांची यादी जाहीर करावी, मंजूर झालेली विमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि पीक विम्यासाठी वगळण्यात आलेले क्षेत्र नियमित करावे, अशा मागण्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या. या मागण्यांबाबत दखल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गांधीजी भजन आंदोलनाचे आयोजन केले होते.

आंदोलनस्थळी तहसीलदार संजय तायडे, AIC पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अमित पवार, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके तसेच रावेर प्रतिनिधी वैभव पाटील, मनोहर पाटील, भगवान पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अमित पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रावेर तालुक्यातील पात्र महसूल मंडळांची यादी उपलब्ध करून दिली. यावेळी अमित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवडाभरात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तसेच ज्या सुमारे १३ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी क्षेत्र कमी दाखविले गेल्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्या प्रकरणांची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आंदोलनस्थळी देण्यात आली.
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही, त्यांच्या प्रकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी रावेर येथील विमा कंपनीच्या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही जिल्हा प्रतिनिधी अमित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी हे कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी मागण्यांबाबत सकारात्मक माहिती दिल्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आठवडाभरात १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याची माहिती तसेच १३ हजार शेतकऱ्यांच्या क्षेत्रासंदर्भातील प्रकरणांची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर गांधीजी भजन आंदोलन थांबविण्यात आले.
या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, सुनील कोंडे, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिंधू पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष वाय. एस. महाजन, धुमा तायडे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, दिलरुबाब तडवी, ॲड. व्ही. पी. महाजन, गुणवंत भंगाळे, सुधीर मोरे, योगेश कोळंबे, विवेक बोंडे, डिगंबर नेहेते, गोपाळ भिरुड, विष्णू भिरुड, शिवराम पाटील, अतुल पाटील, सुनील बऱ्हाटे, हेमराज पवार, संदीप भिरुड, मधुकर पाटील, शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, संतोष पाटील, राहुल पाटील, प्रशांत नेमाडे, मोहन बोंडे, सतीश पाटील आणि चंद्रकांत चौधरी यांच्यासह तालुकाभरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



