
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या पाणीपुरवठ्यावर वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट गडद झाले असून, वाघूर धरण परिसरात वारंवार वीज जाणे आणि ट्रिपिंगच्या समस्येमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दररोज चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास जळगावातील महावितरण अधीक्षक कार्यालयावर तीव्र ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी व हंडा महामोर्चातर्फे देण्यात आला आहे.

वाघ नगर आणि परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघूर धरण क्षेत्रातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे. वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे पाणीपुरवठा वेळेत होत नसून, नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेने महावितरण प्रशासनाकडे केली आहे.
यापूर्वी १९ जून २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी आणि हंडा महामोर्चा टीमच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा महामोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी वीजपुरवठा आणि पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. वाघूर धरण परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, ट्रिपिंग होणे आणि चार ते पाच तास वीज गायब राहणे, यामुळे पाणीपुरवठा उशिराने होत असल्याचे निदर्शनास आले होते.दरम्यान, महावितरणच्या अधीक्षकांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वीजपुरवठ्यातील अडथळे कमी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यानंतर तीन ते चार महिने परिस्थितीत सुधारणा झाली होती. या काळात परिसरातील पाणीपुरवठा सहाव्या दिवशी नियमितपणे होऊ लागल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पुन्हा वीजपुरवठ्याच्या समस्या वाढल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाघूर धरणावरील वीजपुरवठा दररोज चार ते पाच तास खंडित होत असून, वारंवार ट्रिपिंग होत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी, जळगाव शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, वीजपुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी महावितरणने तातडीने तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवक महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळूंके यांना निवेदन देण्यात आले. वाघूर धरण परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या गांभीर्याने घेऊन ती तातडीने सोडवावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहत असल्यास नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका मनोज अडकमोल व हंडा महामोर्चा चे समन्वयक रवींद्र तायडे यांनी मांडली.



