
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेच्या राजकारणात खळबळ उडवणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिला आहे. प्रभाग क्रमांक ५-अ चे नगरसेवक शेख निसार हमीद यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदीनुसार अपात्र घोषित करण्यात आले असून, त्यांचे नगरसेवक पद रिक्त झाले आहे.

यावल येथील उमेश रेवा फेगडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत शेख निसार हमीद यांनी सादर केलेल्या शपथपत्रात १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या ‘शून्य’ असल्याचे नमूद केल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म ६ जून २००३ रोजी झाल्याचा दावा तक्रारदाराने केला होता.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान यावल नगरपरिषदेच्या जन्मनोंदवहीतील नोंद महत्त्वाची ठरली. संबंधित अपत्याची जन्मतारीख ६ जून २००३ अशी नोंद असून, माहिती देणारी व्यक्ती म्हणून स्वतः शेख निसार हमीद यांचे नाव व स्वाक्षरी असल्याचे नोंदीतून समोर आले. यावलमधील दोन शाळांच्या अभिलेखांमध्येही संबंधित अपत्याची जन्मतारीख ६ जून २००३ अशीच असल्याचे आढळून आले.
दरम्यान, शेख निसार हमीद यांनी संबंधित अपत्याचा जन्म २९ ऑगस्ट २००१ रोजी भुसावळ येथे झाल्याचा दावा करत भुसावळ नगरपरिषदेतील नोंद आणि हॉस्पिटलचा अहवाल सादर केला. तसेच यावल नगरपरिषदेतील जन्मनोंद चुकीची असून ती रद्द करण्यासाठी स्वतंत्र अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, यावल नगरपरिषदेतील विद्यमान जन्मनोंद आणि शालेय अभिलेखांतील नोंदी परस्परांशी सुसंगत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. संबंधित जन्मनोंद रद्द करण्याची प्रक्रिया अद्याप अंतिम झालेली नसल्याने सध्याची अधिकृत नोंद ग्राह्य धरण्यात आली.
अखेर उमेश फेगडे यांचा अनर्हतेचा अर्ज मंजूर करत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेख निसार हमीद यांना नगरसेवक पदासाठी अपात्र घोषित केले.
या निकालामुळे भाजपाचे एकूण आठ नगरसेवक असून, त्यांना एका अपक्ष नगरसेवकासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या गटाचे एकूण संख्याबळ १२ झाले आहे.
दुसरीकडे, लोकनियुक्त नगराध्यक्षांना काँग्रेसच्या नऊ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्या बाजूचे नगरसेवक संख्याबळ १२ होते. मात्र, यातील एक नगरसेवक अपात्र ठरल्याने नगरसेवकांचे संख्याबळ आता ११ झाले आहे.



