Home धर्म-समाज मोहराळा येथे २० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

मोहराळा येथे २० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

0
2

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मोहराळा येथे क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य, आदिवासी समाजाची ओळख, हक्क आणि संवैधानिक अधिकारांबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी समाजातील २० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत मोहराळा येथील समाज मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट्रल रेल्वे, भुसावळ मंडळाचे पंकज धावारे (I.R.S.E.) होते. प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअरचे संचालक प्रा. दिगंबर खोब्रागडे, मिशन फॉर अ‍ॅडव्हान्स नॉलेज फाउंडेशन, नागपूरच्या अध्यक्ष डॉ. चंपा भारद्वाज, खान्देश युनिटचे एम.के. गायकवाड, बिरसा महामानव संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बिरम प्रेमजी बोरेला, सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल आणि सपनाबाई कावरसिंग बारेला यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ‘आदिवासींची ओळख, अधिकार आणि विद्रोहाचे प्रतीक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे जीवन व कार्य’ तसेच ‘आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरूपी संवैधानिक उपाययोजना करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत?’ या विषयांवर मान्यवरांनी आपले विचार मांडले. भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनातून आदिवासी समाजाने प्रेरणा घेऊन आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते आदिवासी समाजातील २० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई, फुले-आंबेडकरी गौरवशाली आणि आदर्शवादी मोहीम (पैगाम), खान्देश युनिट, मिशन फॉर अ‍ॅडव्हान्स नॉलेज फाउंडेशन, नागपूर आणि बिरसा महामानव संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला आदिवासी बांधव, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound