यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव दिन’ जळगाव येथे अत्यंत उत्साहात, विविध समाजोपयोगी उपक्रमांनी आणि शासकीय योजनांच्या लाभ वितरणाने साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मुख्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
मुख्य सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास (जी.एस. ग्राउंड) मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या चित्ररथास खासदार स्मिता वाघ व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते पुष्पंजली अर्पण करून प्रभातफेरीला उत्साहात सुरुवात झाली. या प्रभातफेरीत जिल्ह्यातील आदिवासी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आदिवासी नृत्य पथकांनी सादर केलेल्या लोकनृत्य, महापुरुषांचे फलक, भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची महती सांगणारे घोषणा आणि प्रेरणादायी विचार, यांमुळे संपूर्ण जळगाव शहर दुमदुमून गेले होते. नागरिक, विद्यार्थी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने निघालेली ही प्रभातफेरी शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचली व येथे तिचा समारोप झाला.
जिल्हा नियोजन भवनात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्य सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक कल्याणकारी योजनांची तसेच आदिवासी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण व गुणवंत सत्कार सोहळा पार पडला. यामध्ये आदिवासी महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी व स्वयंवरोगासाठी चालना देण्यासाठी महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे व विद्यार्थी व नागरिकांना जातीच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या ‘पवित्र पोर्टल’द्वारे पारदर्शक प्रक्रियेतून शिक्षक म्हणून निवड होऊन रुजू झालेल्या नवर्निवाचित शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी व संस्कृती संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या समाजातील सन्माननीय व्यक्तिमत्त्वांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे ना. गिरीश महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतीकारी कार्याचे व बलिदानाचे स्मरण केले. भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन आणि आदिवासी बांधवांच्या अस्मितेसाठी दिलेला लढा आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून, राज्य शासन आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात केंद्रीय राज्यमंत्री ना.
रक्षाताई खडसे यांनी ‘जनजातीय गौरव दिसा’चे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले. केंद्र व राज्य शासन आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवत असून शासन एक मजबूत ‘सपोर्ट सिस्टीम’ म्हणून काम करत आहे; परंतु जोपर्यंत समाज स्वतः पुढाकार घेत नाही, तोपर्यंत अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही, असे सांगून नागरिकांनी जागरूक होऊन शिक्षण आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतः पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी खासदार स्मिताताई वाघ यांनीही आपल्या मनोगतून भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व बिरसा मुंडा यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे असे विचार व्यक्त केले. आदिवासी समाज हा शब्द पाळणारा आहे व अत्यंत सामान्य आहेत असे मत प्रकट करून आदिवासी बांधवांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.या भव्य सोहळ्याला आमदार सुरेश भोळे, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोंढे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी रमेश घापके, तहसीलदार शितल राजपूत, यांच्यासह सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण डाभाडे, पवन पाटील मिनाक्षी सुलनाने लेखाधिकारी दिपाकांत वाघ व मनोज तडवी यासोबत प्रकल्प कार्यालय यावल येथील अधिकारी व कर्मचारी तसेच इतर विभागांचे मान्यवर उपस्थित होते.
तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हा व तालुका पातळीवरील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले.
तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हा व तालुका पातळीवरील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले.



