Home धर्म-समाज तापी नदीच्या तीरावर छटपूजेचा भक्तिमय सोहळा ! भुसावळमध्ये ५ ते ६ हजार...

तापी नदीच्या तीरावर छटपूजेचा भक्तिमय सोहळा ! भुसावळमध्ये ५ ते ६ हजार भाविकांची उपस्थिती

0
2

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर भारतीय समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा छटपूजेचा उत्सव भुसावळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील फिल्टर हाऊस परिसरातील तापी नदीच्या काठावर भुसावळ छट पूजा समितीच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात सायंकाळी सुमारे पाच ते सहा हजार भाविक सहभागी झाले होते. महिला भाविकांनी तापी नदीच्या पात्रात उतरून सूर्यदेव आणि छठी मातेची विधिवत पूजा-अर्चा केली. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भारलेल्या या सोहळ्यामुळे तापी नदीचा परिसर भक्तिमय झाला होता.

छटपूजेच्या निमित्ताने महिला भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत नदीपात्रात उतरून धार्मिक विधी पूर्ण केले. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने नागरिक या पूजेसाठी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून जपल्या जाणाऱ्या या परंपरेचे दर्शन यानिमित्ताने घडले.

भुसावळ छट पूजा समितीच्या वतीने तापी नदीच्या काठावर आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. परिसरात रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. भाविकांना पूजेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि धार्मिक विधी पार पाडताना अडचणी येऊ नयेत, यासाठी समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष विक्रांतसिंह राजपूत यांच्यासह पदाधिकारी या आयोजनासाठी उपस्थित होते. या उत्सवात रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आयुध निर्माणी भुसावळ येथील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्तर भारतीय समाजातील नागरिकांनी आपल्या धार्मिक परंपरेचे जतन करत सामूहिकरीत्या छटपूजा साजरी केली. विविध समाजांतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला सामाजिक एकतेचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, परीक्षित बऱ्हाटे, किरण कोलते, भाजपचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह रेल्वेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पूजाअर्चा पूर्ण झाल्यानंतर भाविकांनी पूजेसाठी वापरलेले साहित्य आपापल्या घरी नेले. मात्र, नदीपात्रात उतरून पूजा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याचे दिसून आले नाही. यासंदर्भात समितीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यात आली होती का, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मोठ्या संख्येने भाविक नदीपात्रात उतरत असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था असणे महत्त्वाचे असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली.


Protected Content

Play sound