दीपनगर, ता.भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला वारंवार गळती होत असल्याने निंभोरा परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गळतीमुळे राखमिश्रित पाणी थेट निवासी भागात व लगतच्या शेतजमिनींमध्ये साचत असल्याने नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या, दुर्गंधी आणि धुळीच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी महानिर्मिती प्रशासनाविरोधात तीव्र तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक शेतकरी दिलीप त्र्यंबक भिरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या नवीन नसून गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार उद्भवत आहे. राखमिश्रित पाणी थेट त्यांच्या शेतात घुसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

-
१४ एप्रिल २०२४ ची घटना: यापूर्वी १४ एप्रिल २०२४ रोजीदेखील अशाच प्रकारे पाईपलाईन फुटून भिरुड यांच्या शेतात राखेचा मोठा थर साचला होता.
-
अधिकाऱ्यांची पोकळ आश्वासने: त्या वेळी उपमुख्य अभियंता कुंभार आणि अधीक्षक अभियंता लाडवंजारी यांनी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. तसेच कंत्राटदार संस्थेनेही दुरुस्तीचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
पुन्हा एकदा पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी गोहिल साहेब आणि तडवी साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, “अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात; परिस्थिती मात्र ‘जैसे थे’ राहते,” असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
राखमिश्रित पाणी रस्ते आणि निवासी परिसरात साचल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. वाळल्यानंतर उडणारी राख आणि दुर्गंधीमुळे लहान मुले व वयोवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आता महानिर्मिती प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेते आणि शेतकरी दिलीप भिरुड यांना नुकसानभरपाई देऊन या समस्येवर कधी कायमस्वरूपी तोडगा काढते, याकडे संपूर्ण निंभोरा परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.



