जळगाव-रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य भुलाबाई महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केशव स्मृती प्रतिष्ठान, डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन आणि रावेर नगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या महोत्सवात लहान, मोठा आणि खुला अशा तीन गटांतून तब्बल २४ संघांनी उत्साहाने सहभाग घेत एकाहून एक सरस सादरीकरण केले. पारंपरिक भुलाबाई संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीपर्यंत तिची ओळख पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम रावेरकरांसाठी सांस्कृतिक पर्व ठरला.
रावेर नगरपालिकेच्या हॉलमध्ये गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी भुलाबाई महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, सर्व नगरसेविका तसेच डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन यांच्या प्रयत्नातून आणि केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनीच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी रंजनाताई पाटील (मोरगाव) होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रावेरच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, दीपिका अग्रवाल, राष्ट्र सेविका समितीच्या कांता पटेल, परीक्षक पियुष रावळ, प्रांजली रस्से, सचिन भिडे आणि डॉ. पूजा महाजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून भुलाबाईची आरती करण्यात आली. मोनिका महाजन यांनी भुलाबाईची आरती सादर केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी जोशी यांनी केले. रावेर येथे भुलाबाई महोत्सव आयोजित करण्यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. भुलाबाई ही खानदेशातील समृद्ध लोकपरंपरा असून, या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात भुलाबाई संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे बॅनरही लावण्यात आले होते.

भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डॉ. केतकी पाटील फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाशी संवाद साधत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांमुळे सहभागी संघ आणि उपस्थितांचा उत्साह वाढला. यानंतर लहान गट, मोठा गट आणि खुला गट अशा क्रमाने २४ संघांनी भुलाबाईचे सादरीकरण केले. पारंपरिक वेशभूषा, गीते, नृत्य, अभिनय आणि सांस्कृतिक सादरीकरणातून सहभागी संघांनी भुलाबाई परंपरेचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. प्रत्येक संघाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादरीकरण केल्याने उपस्थित प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली.
परीक्षकांनी सादरीकरणांचे परीक्षण करून निकाल जाहीर केला. विजेत्या संघांना रावेरच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे पियुष रावळ, सचिन भिडे, प्रांजली रस्से, डॉ. पूजा महाजन तसेच रावेरच्या नगरसेविकांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, शैक्षणिक साहित्याचे पॅड आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. लहान गटात आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शांती विद्या मंदिर, फैजपूर यांनी द्वितीय, तर जिल्हा परिषद शाळा, पुनखेडा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. मोठ्या गटात उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर यांनी द्वितीय, तर शिवफुले आखाडा, रावेर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सुज्ञा अरुण महाजन शाळा, वढोदा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
खुल्या गटात राजपूत महिला मंडळ, कोचुर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर यांनी द्वितीय, तर सुंदरकांड महिला मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. नेवे समाज मंडळ, भुसावळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रेखा बोन्डे, रावेर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष आशा कोळी, पूनम बोन्डे, नंदिनी पंत, सुरेखा अस्वल, शारदा चौधरी, अनिता तायडे, वंदना महाजन, शाहीन शेख, मेघा भागवत आणि सुनीता डेरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व रसिक प्रेक्षक उपस्थित होते. सहभागी सर्व संघांना भुलाबाईचा पारंपरिक खाऊ वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपाली महाजन यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका योगिता महाजन, अर्चना पाटील, सीमा जमादार, प्रमिला पाटील, जयश्री महाजन, सपना महाजन, भाग्यश्री इंगळे, अनिता तायडे, शाहीन शेख, हर्षाली महाजन, शुभांगी महाजन, रेखा बोन्डे, गौरी जोशी आणि आसावरी जोशी यांच्यासह रावेर नगरपालिका व अंबिका व्यायामशाळेचे सहकार्य लाभले.



