पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पारोळा नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ तसेच ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत विशेष स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त सुरुवात करण्यात आली. नवीन भाजीपाला मार्केट, स्वर्गीय मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल तसेच बाजारपेठ परिसरात राबविण्यात आलेल्या या अभियानातून ‘स्वच्छ पारोळा, सुंदर पारोळा, निरोगी पारोळा, विकसित पारोळा’ असा स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
या अभियानास नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, आरोग्य सभापती डॉ. मंगेश तांबे, शिवसेना गटनेते अमृत चौधरी, भाजपा गटनेते धीरज महाजन यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियानाच्या माध्यमातून बाजारपेठ परिसरातील स्वच्छता, कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा उल्लेख करत स्वच्छता ही केवळ आरोग्याशी संबंधित बाब नसून निरोगी, सुसंस्कृत आणि जबाबदार समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे यांनी स्वच्छतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याची गरज व्यक्त केली. बाजारपेठ परिसरात नियमित कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी व्यापारी तसेच नागरिकांना ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवण्याचे आवाहन केले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि बाजारपेठ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य सभापती डॉ. मंगेश तांबे यांनी स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. नागरिक, व्यापारी, नगरपरिषद कर्मचारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी व शाश्वत होऊ शकते, असा संदेश त्यांनी दिला.
‘सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा, स्वच्छ व सुंदर पारोळा आणि लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. स्वच्छतेची सवय केवळ अभियानापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक नितीन दत्तात्रय सोनार, राजेंद्र हिम्मत कासार, प्रमोद गणपत कासार, अमोल गोविंद शिरोळे, नरेंद्र राजपूत, पंकज राजेंद्र मराठे, विवेक पतंगराव पाटील, भूषण प्रकाश टिपरे, नजीर खान हमीद खान बेलदार, राजेंद्र मोतीलाल कासार, मनीष भाईदास पाटील, गोपाल मुरलीधर दाणेज, अलका धीरज महाजन, निर्मला अशोक वाणी, वंदना गोविंद शिरोडे, मंगलाबाई सुदाम चौधरी, पल्लवी मनोज जगदाळे, स्मिता छोटू पाटील, किरण चंद्रकांत पाटील, भाग्यश्री दीपक अनुष्ठान, हमिदा बी. शेख सलीम, सुवर्णा विनोद पाटील, कविता रमेश मिस्तरी, माधुरी दगडू पवार आदी उपस्थित होते.
तसेच स्थापत्य अभियंता सुमित पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन, स्वीय सहाय्यक तथा सभा लिपिक किशोर चौधरी, भूषण महाजन यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य निरीक्षक दिलीप चौधरी, सिद्धार्थ इंगळे, शुभम कंखरे, मोतीलाल बळीराम पाटील, विश्वास पाटील, निर्भय मोरे, सतीश चौधरी, कैलास वानखेडे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



