यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील ‘बालसंगोपन योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरीत करण्यात यावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात यावेत, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (रावेर लोकसभा) चे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे यांना जळगाव येथे प्रत्यक्ष भेटून दिले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ, निराधार आणि गरजू बालकांच्या संगोपनासाठी ‘बालसंगोपन योजना’ राबवली जाते. ही योजना बालकांसाठी अत्यंत दिलासादायक असली तरी, जळगाव जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा नियमित लाभ मिळालेला नाही, अशी गंभीर बाब राकेश सोनार यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

योजनेचा लाभ वेळेवर न मिळाल्यामुळे चिमुकल्यांचे शिक्षण, आरोग्य आणि संगोपनावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. तसेच हातावर पोट असलेल्या गरजू पालकांना व नातेवाईकांना लाभाच्या आशेने शासकीय कार्यालयांचे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे जिल्ह्यातील अनेक पात्र आणि गरजू बालके आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
-
प्रलंबित निधी वितरीत करा: जळगाव जिल्ह्यातील बालसंगोपन योजनेचा मागील ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरित करण्यात यावा.
-
नियमित लाभ मिळण्यासाठी सूचना: पात्र लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे लाभ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेला सख्त सूचना देण्यात याव्यात.
-
प्रक्रिया सुलभ करा: लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांत होणारा नाहक त्रास थांबवून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात यावी.



