जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर राजूमामा भोळे यांना आमचे काम करावे लागेल असे वक्तव्य सुरेशदादा जैन यांनी करून एका चर्चेला तोंड फोडले आहे.
आज सायंकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला. अमळनेर येथील मेळाव्यातील राडा झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नेते तणावात राहतील असे मानले जात होते. या पार्श्वभूमिवर, या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यात अमळनेर येथील दुर्दैवी घटनेचा कुणी उल्लेख केला नाही. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी युती अभेद्य असल्याची ग्वाही दिली. यात भाषण करतांना सुरेशदादा जैन यांनी मात्र आमदार राजूमामा भोळे यांना कोपरखळी मारली. ते म्हणाले की, मला आता निवडणूक लढवायची नाही. मात्र हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. यामुळे जागा कुणाला मिळते हे वरून ठरेल. मात्र आम्हाला जागा मिळाल्यास मामांना आमचे काम करावे लागेल. तर भाजपला मिळाल्यास आम्ही त्यांचे काम करू.
गत अनेक दिवसांपासून विशेषत: पुन्हा युती झाल्यानंतर जळगावातील राजकारणात ही जागा नेमकी कुणाला सुटणार ? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमिवर, सुरेशदादांचे हे वक्तव्य नव्या चर्चेला आमंत्रण देणारे ठरले आहे.
पहा : सुरेशदादा जैन नेमके काय म्हणालेत ते !