
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीसाठी पाण्याचे नियोजन आणि आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद येथे ‘समृद्धी की पाठशाला’ या उपक्रमांतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वाघूर डावा कालवा असोदा-भादली शिवार परिसरातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

केंद्र सरकारच्या एमसीएडी समृद्धी योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत पाणी व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि आधुनिक सिंचन पद्धतींचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अशोक जेएफ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी. डी. जडे तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे घेता येईल, यावर विशेष भर देण्यात आला. पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत मान्यवरांनी आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. जलस्रोतांचे योग्य नियोजन आणि सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून उत्पादनवाढ साधता येऊ शकते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. केंद्रीय जलसंधारण विभागाचे प्रकल्प संचालक अशोक जेएफ यांनी प्रेशरयुक्त पाईप सिंचन प्रणालीचे फायदे सविस्तरपणे सांगितले. पारंपरिक सिंचन पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, प्रेशर पाईप इरिगेशन प्रणालीमुळे पाण्याची वाहतूक अधिक परिणामकारक होते. बाष्पीभवन आणि गळतीमुळे होणारे नुकसान कमी होते तसेच पिकांना आवश्यक तेवढेच पाणी योग्य वेळी उपलब्ध होते. यामुळे उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन आणि पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समृद्धी योजनेच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. त्याच उद्देशाने ही योजना राबविली जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान पाणी वापर, पाणी बचत आणि प्रेशर पाईप इरिगेशन प्रणालीविषयी माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. समाजमाध्यम तज्ज्ञ अंकित पांडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी. डी. जडे आणि पंडित शिंदे यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक अभियंता किशोर देशमुख यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अपूर्वा वाणी यांनी केले. कार्यक्रमास वाघूर प्रकल्प आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



