Home Cities अमळनेर सायबर गुन्हेगारांचा धक्कादायक डाव ! OTP न येताच IDBI खात्यातून जवळपास 95...

सायबर गुन्हेगारांचा धक्कादायक डाव ! OTP न येताच IDBI खात्यातून जवळपास 95 हजार रुपये लंपास

0
2


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून कोणताही OTP अथवा बँकेचा पुष्टीकरण कॉल न येता जवळपास 95 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार सायबर क्राइम पोर्टलवर नोंदविण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील ताडेपूरा परिसरातील रहिवासी तथा अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत असलेले योगेश आधार पवार (वय 32) यांच्या IDBI बँक खात्यातून 5 जून 2026 रोजी सकाळी 11.38 वाजता दोन स्वतंत्र व्यवहारांद्वारे एकूण 94 हजार 999 रुपये 97 पैसे काढण्यात आले. पहिल्या व्यवहारात 50 हजार रुपये तर दुसऱ्या व्यवहारात 44 हजार 999 रुपये 97 पैसे वळते करण्यात आले. विशेष बाब म्हणजे संपूर्ण व्यवहारादरम्यान पवार यांच्या मोबाईलवर कोणताही OTP प्राप्त झाला नाही. तसेच बँकेकडून कोणताही कॉल अथवा व्यवहाराची पूर्वसूचना मिळाली नाही. पैसे कपात झाल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अचानक खात्यातून मोठी रक्कम वळती झाल्याचे पाहून पवार यांना धक्का बसला.

फसवणुकीची माहिती मिळताच त्यांनी आपल्या मित्रांशी संपर्क साधला. यावेळी गौतम बिऱ्हाडे, सतीश बिऱ्हाडे आणि अनंत संदानशिव यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. अनंत संदानशिव यांनी प्रसंगावधान राखत राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली. व्यवहाराची वेळ, रक्कम आणि बँक खात्याचा तपशील यासह सर्व आवश्यक माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली. त्यामुळे पुढील तपास प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी राहुल चव्हाण यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी IDBI बँकेलाही आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची फसवणूक सिम क्लोनिंग, मोबाईल हॅकिंग, मालवेअर हल्ला किंवा प्री-अप्रूव्ह्ड ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून होऊ शकते. विशेषतः OTP न मिळताही व्यवहार पूर्ण झाल्याने या प्रकरणात तांत्रिक त्रुटी अथवा सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या पद्धतीचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे ऑनलाइन बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि डिजिटल व्यवहारांची सुरक्षा याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound