Home Cities जळगाव कुंभमेळा बनावट कार्यादेश प्रकरण: प्रकरणाची CBI मार्फत निष्पक्ष चौकशी करा; छत्रपती शिवाजी...

कुंभमेळा बनावट कार्यादेश प्रकरण: प्रकरणाची CBI मार्फत निष्पक्ष चौकशी करा; छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी

0
6

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची धार्मिक व सांस्कृतिक अस्मिता असलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कथित बोगस आणि बनावट कार्यादेश (Work Orders) प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कोट्यवधी हिंदू बांधवांच्या श्रद्धा व आस्थेशी निगडित असलेल्या या पवित्र सोहळ्याच्या नावाने झालेल्या या गंभीर गैरप्रकाराची तातडीने आणि निष्पक्षपणे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जळगाव येथे १० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीच स्वतः या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांच्या नावाने बोगस व बनावट कार्यादेश तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी पत्रकार परिषदेत या कागदपत्रांच्या प्रती प्रत्यक्ष दाखवल्या होत्या. या कार्यादेशांवरील स्वाक्षऱ्याही बनावट असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. केंद्र व राज्य शासनाकडून या भव्य सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी व नियोजन केले जात असताना, अशा संवेदनशील विषयात शासनाची व प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
या प्रकरणात स्वच्छ व निष्पक्ष प्रशासकीय प्रतिमा असलेले विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा किंवा स्वाक्षरीचा गैरवापर करून त्यांना संशयाच्या भोवऱ्यात आणण्याचा कट रचला गेला आहे का, याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणामागे कोणते राजकीय, प्रशासकीय अथवा हितसंबंधी घटक कार्यरत आहेत, तसेच या बनावट कागदपत्रांची निर्मिती, प्रसार आणि वापर कोणी व कोणत्या उद्देशाने केला, याचा मुळाशी जाऊन तपास होणे अत्यंत अत्यावश्यक बनले आहे.
केवळ प्रशासकीय पातळीवर चौकशी न करता निष्पक्ष आणि स्वतंत्र यंत्रणेमार्फत सत्य जनतेसमोर आणणे ही काळाची गरज आहे. या प्रकरणामुळे शासन व प्रशासनावरील जनतेचा विश्वास ढळू नये आणि कुंभमेळ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये, यासाठी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कथित बनावट स्वाक्षऱ्या व शासकीय कागदपत्रांचा गैरवापर करणाऱ्या सर्व घटकांची भूमिका तपासून राजकीय किंवा प्रशासकीय सहभाग आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक सोहळ्याच्या नावाने कोणताही गैरप्रकार किंवा फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत छत्रपती शिवाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालून तातडीने CBI चौकशीचे आदेश द्यावेत अशी आग्रही विनंती केली आहे.


Protected Content

Play sound