


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतजमिनीवरील पीक पेरा नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप व संबंधित प्रणालीचा वापर करत आहेत. मात्र, या सॉफ्टवेअरमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद सिस्टीममध्ये योग्य प्रकारे होत नाही. मोबाईल ॲपवरून नोंद दाखवली तरी ७/१२ उताऱ्यावर ‘Error’ दिसत असून पीक पेरा नोंद झालेली दिसून येत नाही. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष जमील शेख यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना वेळेत योग्य ७/१२ उतारा व पीक पेरा नोंद न मिळाल्याने त्यांना पीक विमा, शासकीय अनुदान, नुकसानभरपाई तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज असताना, या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रशासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये पीक पेरा नोंदणीच्या सॉफ्टवेअरमधील सर्व तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्यात याव्यात आणि सॉफ्टवेअर सुरळीत चालण्यासाठी योग्य नियोजन करावे. तांत्रिक अडचणींमुळे ज्या शेतकऱ्यांची नोंद होऊ शकली नाही, त्यांना नोंदणीसाठी पुरेसा अतिरिक्त कालावधी देण्यात यावा. तसेच संबंधित तलाठी व महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन प्रलंबित पीक पेरा नोंदी त्वरित पूर्ण करून घेण्यात याव्यात.
यासोबतच, तांत्रिक त्रुटींचा फटका बसून कोणताही शेतकरी पीक विमा किंवा नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि अडचणी दूर झाल्यानंतर अद्ययावत ७/१२ उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी याबाबत जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंती शहराध्यक्ष जमील शेख यांनी केली आहे.



