Home प्रशासन बोगस शालार्थ आयडी घोटाळा : कुऱ्हा येथील शाळेत नाशिक SIT पथक दाखल;...

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : कुऱ्हा येथील शाळेत नाशिक SIT पथक दाखल; १४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची सखोल चौकशी

0
11


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अवैध नियुक्त्या केल्याच्या गंभीर आरोपांनंतर आता प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नाशिक येथील विशेष तपास पथक (SIT) कुऱ्हा काकोडा येथील स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालयात दाखल झाले आहे. एसआयटीचे पथक तपासासाठी अचानक शाळेत धडकल्याने संबंधित शैक्षणिक संस्था आणि शाळा प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यालयातील तब्बल १४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा प्राथमिक आरोप आहे. या नियुक्त्या कायदेशीर दाखवण्यासाठी बोगस शालार्थ आयडी, संस्थेचे बनावट ठराव, कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक, संचमान्यता आणि इतर विविध शासकीय दस्तऐवजांमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एसआयटीचे पथक दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी शाळेत पोहचले असताना एक नाट्यमय प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पथक दाखल होताच संस्थेचे सचिव शाळा परिसरातून निघून गेले, तर मुख्याध्यापक विनोद चौधरी हे शाळेच्या मागील प्रवेशद्वारातून बाहेर पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यामुळे चौकशी यंत्रणेला संबंधितांकडून योग्य ते सहकार्य दिले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शासकीय नियमांनुसार संबंधित तुकड्यांना कोणतेही अनुदान मंजूर नसतानाही या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या दाखवून मोठा गैरव्यवहार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण घोटाळ्यामुळे शासनाच्या तिजोरीचे तब्बल ४० कोटी रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे; मात्र या रकमेची खरी आकडेवारी आणि अधिकृत निष्पन्नता एसआयटीच्या सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. याशिवाय, संबंधित शैक्षणिक संस्थेच्या इतर शाखांमध्येही विनाअनुदानित तुकड्यांवर अशाच प्रकारे बेकायदेशीर कर्मचारी भरती केल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेने केवळ एका शाळेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण संस्थेतील शिक्षक भरती, शालार्थ आयडी, संचमान्यता आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक पातळीवरून जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound