जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव विभागातील उच्च शिक्षण प्रशासनाच्या कामकाजाला अधिक सुसूत्रता आणि गती मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग यांच्या नूतन कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. महाबळ कॉलनी रोडवर, रामानंद नगर पोलीस स्टेशनलगत उभारण्यात आलेल्या या आधुनिक इमारतीमुळे महाविद्यालये, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना विविध प्रशासकीय व शैक्षणिक कामांसाठी अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपविभागीय अधिकारी एस. एल. देवरे आणि शाखा अभियंता बी. एस. घुगे हेही उपस्थित होते.

महाबळ कॉलनी रोडवरील या नूतन वास्तूची उभारणी झाल्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र आणि सोयीस्कर जागा उपलब्ध झाली आहे. जळगाव विभागातील विविध महाविद्यालयांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया, प्राध्यापकांचे प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे कार्यालयीन कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने पार पाडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला जळगाव शहर आणि जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.



