Home Cities जळगाव कार्तिक पौर्णिमेनिमित्त जळगावच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ; दोन दिवसांत...

कार्तिक पौर्णिमेनिमित्त जळगावच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ; दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राच्या पावन पर्वानिमित्त जळगाव शहरातील निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळली. भगवान कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावली. २३ नोव्हेंबर रोजी रात्री मंदिराचे द्वार उघडल्यापासून २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेपर्यंत दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन तासांत ३३ अभिषेक करण्यात आल्याने धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

यंदा कृत्तिका नक्षत्राचा शुभयोग अधिक काळ असल्याने दर्शनासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मंदिराचे द्वार उघडण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. मंदिराचे द्वार उघडल्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० या दोन तासांच्या कालावधीत तब्बल ३३ अभिषेक करण्यात आले. मंदिराच्या अध्यक्षा श्रीमती वासंती अय्यर आणि मंदिराचे पुजारी कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती पाठक गुरुजी गोविंद तिवारी यांनी मंत्रोच्चारात पूजाविधीला प्रारंभ केला. यावेळी केरळी महिला ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते.

दर्शनासाठी मंदिर परिसरापासून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गर्दी लक्षात घेऊन मंदिरासमोर अभिषेकासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना दर्शनासोबतच त्यांच्या मनोकामना आणि धार्मिक श्रद्धांबाबत मार्गदर्शनही करण्यात येत होते. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या कपाळावर टिळा लावून त्यांना चण्याचा प्रसाद देण्यात येत होता. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने दिवसभरात स्थानिक नगरसेवक, अतुल जैन, सीतारामदादा सोनवणे यांच्यासह आजी-माजी आमदार आणि खासदारांनीही मंदिरात भेट देऊन भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उत्सवाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

अनेक भाविक नवस फेडण्यासाठी तसेच भगवान कार्तिक स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात आले होते. दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती मिळते, अशी भावना काही भाविकांनी व्यक्त केली. कृत्तिका नक्षत्राच्या शुभयोगामुळे यंदा दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता मंदिराचे द्वार बंद करण्यात आले. उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दर्शन आणि पूजेची व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी केरळी महिला ट्रस्टच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राच्या पर्वामुळे अय्यप्पा स्वामी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.


Protected Content

Play sound