Home Cities यावल हजार झाडे लावली, जगली फक्त शंभर? किनगाव–मालोद–वाघझिरा वृक्षारोपण प्रकरणाची चौकशी करण्याची मनविसेची...

हजार झाडे लावली, जगली फक्त शंभर? किनगाव–मालोद–वाघझिरा वृक्षारोपण प्रकरणाची चौकशी करण्याची मनविसेची मागणी!

0
6


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून वृक्षारोपण केले जाते; मात्र लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा पार पाडते का, असा गंभीर प्रश्न किनगाव–मालोद–वाघझिरा रस्त्यावरील वृक्षारोपणाच्या दुरवस्थेमुळे उपस्थित झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्षारोपणापैकी अंदाजे एक हजार झाडांमध्ये केवळ शंभरच्या आसपास झाडे जिवंत असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाच्या कामाची आणि त्यासाठी खर्च झालेल्या शासकीय निधीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनविसेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

किनगाव–मालोद–वाघझिरा रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात झाडे मृत झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा संघटनेने केला आहे. अंदाजे एक हजार झाडे लावण्यात आली असताना त्यापैकी केवळ शंभरच्या आसपास झाडेच जिवंत असल्याचे चित्र असल्याने वृक्षारोपणाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी खर्च झालेल्या निधीचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग, यावल येथे निवेदन सादर करण्यात आले. उपविभागीय अधिकारी जहांगीर तडवी यांच्यासाठी देण्यात आलेल्या या निवेदनात वृक्षारोपणाच्या कामाशी संबंधित आठ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर माहिती मागविण्यात आली आहे.

वृक्षारोपणासाठी शासनाकडून किती निधी मंजूर झाला, प्रत्यक्षात किती झाडे लावण्यात आली, हे काम कोणत्या ठेकेदाराने किंवा संस्थेने केले, कामाची अंदाजपत्रकीय किंमत किती होती आणि प्रत्यक्षात किती खर्च करण्यात आला, याचा तपशील देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच झाडांच्या संगोपनासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली होती, त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कोणाकडे सोपविण्यात आली होती आणि देखभालीसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याबाबतही स्पष्ट माहिती मागविण्यात आली आहे.

केवळ कागदोपत्री वृक्षारोपण दाखवून शासकीय निधी खर्च झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी मनविसेने केली आहे. संबंधित रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून मृत झालेल्या झाडांची संख्या निश्चित करावी. त्याचबरोबर झाडांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था, संगोपन आणि नियमित देखभाल यांचीही तपासणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वृक्षारोपणाच्या कामात आर्थिक अनियमितता, हलगर्जीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. वृक्षारोपणासाठी निधी मंजूर करणे एवढेच प्रशासनाचे काम नसून लावलेली झाडे प्रत्यक्षात जगविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
“वृक्षारोपणाचे फोटो काढून प्रसिद्धी मिळविणे म्हणजे पर्यावरण संवर्धन नव्हे; तर लावलेले प्रत्येक झाड जगविणे ही खरी जबाबदारी आहे. जनतेच्या कररूपी पैशाचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे!” अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने केवळ कागदोपत्री उत्तर न देता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकरणात प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास माहिती अधिकार अधिनियम तसेच इतर कायदेशीर मार्गांचा अवलंब करून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही मनविसेच्या वतीने देण्यात आला आहे. हे निवेदन विकास जंजाळे, वरिष्ठ लिपिक, सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल यांनी स्वीकारले.

यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, जिल्हा सचिव विष्णू कोळी, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव अमोल पाटील, मनविसे तालुकाध्यक्ष गौरव सोनवणे, तालुका संघटक चेतन पवार, तालुका उपाध्यक्ष नितीन कोळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Protected Content

Play sound