रिलीजच्या आठवड्याभरापूर्वी ‘पानिपत’वर वादाचे संकट

panipat

मुंबई वृत्तसंस्था । पानिपतच्या युद्धावर आधारित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्याच्या आठवड्याभरापूर्वी वादात सापडला आहे. या चित्रपटातील एका दृश्यात मस्तानीबाईंविषयी दाखवलेल्या एका संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशज नवाब शादाब अली बहादुर यांनी आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री क्रिती सॅनॉन हिच्या तोंडी असलेल्या संवादावर त्यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. “मैने सुना है जब पेशवा अकेले मोहिम पर जाते है तो एक मस्तानी के साथ लौटते है” (मी ऐकलंय, पेशवा जेव्हा एकटे मोहिमेस जातात तेव्हा माघारी येताना एक मस्तानी घेऊनच येतात), अशा आशयाचा हा संवाद आहे. “चित्रपटात हा संवाद अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरला गेला असून त्याला माझा विरोध आहे. या संवादातून मस्तानी साहिबांसोबतच पेशव्यांचीही चुकीची प्रतिमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मस्तानीबाई या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी होत्या. चित्रपट आणि ट्रेलरमधील हा संवाद वगळण्याविषयीची नोटीस मी निर्माते व दिग्दर्शकांना पाठवली आहे. त्यांनी नोटीसीला प्रतिसाद न दिल्यास मी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेईन”, असे वक्तव्य नवाब शादाब अली बहादूर यांनी दिलेल्या मुलाखतीत केलेय. ‘पानिपत’ या चित्रपटात पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची कथा दाखवण्यात आली. यामध्ये अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ तर क्रिती पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. यासोबतच संजय दत्त, मोहनिश बहल, पद्मिनी कोल्हापुरे आणि झीनत अमान यांच्याही भूमिका आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Protected Content