अरविंद बनसोड मृत्यूप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद – प्रकाश आंबेडकर

नागपूर वृत्तसंस्था । अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड यांचा २७ मे रोजी मृत्यू झाला. नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील गॅस गोडाऊन ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. यावेळी त्यांच्या बाजूला किटकनाशकाची बाटलीही आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. पण, ही आत्महत्या नसून अरविंद बनसोड यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगत, सीबीआई चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अरविंद बनसोड (वय-३२) हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पदवीचे शिक्षण घेतलेला अरविंद त्याच्या पिंपळदरा गावासोबतच आजूबाजूच्या गावातही सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध होता. २७ मे रोजी नरखेड तालुक्यातील थंडीपवनी या शेजारच्या गावात तो आला होता. या ठिकाणी असलेल्या घरगुती गॅस एजन्सीचा फोटो काढत असताना एजन्सी संचालक असलेल्या मयूर उमरकर याच्याशी अरविंदचा वाद झाला. यावेळी अरविंदसोबत त्याचा एक मित्रही उपस्थित होता. मयूरने त्यावेळी अरविंदला मारहाण केली, असा आरोप अरविंदच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मारहाण केल्यानंतर अरविंद तेथून निघून नजीकच्या बँकेत आला. त्या ठिकाणीही अरविंद बनसोडला मयूर उमरकर आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे अपमानित झालेल्या अरविंदने किटनाशक प्राशन केले. किटनाशक प्राशन केल्यावर अरविंद गॅस एजन्सी समोर पडून होता. तेथून मयूर उमरकर यानेच अरविंदला स्थानिक आरोग्य केंद्रात आणि पुढे नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र मयूर उमरकर यानेच अरविंदला मारल्याचा आरोप अरविंदच्या कुटुंबीयांनी केला असून स्थानिक नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असल्याचा आरोपही मृत अरविंदच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मयूर उमरकर हा राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य आहे. त्याशिवाय मयूरचे वडील बंडू उमरकर हे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. उमरकर यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने आणि नरखेड तालुका हा खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असल्याने पोलीस मयूर उमरकरचा बचाव करीत असल्याचा आरोप मृत अरविंदच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. आता या मृत्यू प्रकरणात राजकीय पक्षांनी उडी घेतली असून वंचित बहुजन आघाडीतर्फे या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे. याविषयी वंचित आघाडीच्या नेत्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन अॅट्रॉसिटी आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मयूर उमरकर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी मयूरने अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास हा योग्य रितीने होत नसल्याचा आरोप मृत अरविंदच्या कुटुंबीयांनी केला आहे. मयूर उमरकर यांचेशी झालेल्या वादातून अरविंदने विष प्राशन केल्याचं पोलीस सांगतात मात्र केवळ याच कारणास्तव अरविंद आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाही, असं अरविंदच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सीबीआय मार्फत चौकशीची मागणी आता जोर धरु लागली आहे.

Protected Content