स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पीकविमा कंपन्यांविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू

82cf443c 2d1c 4f67 89f6 b94b89b7cf47

अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पीक विमा कंपन्यांविरोधात सोमवारपासून तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे.

 

यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण तालुक्यात दुष्काळ असून गेल्या पावसाळ्यापासुनच टँकर सुरु आहेत. केंद्रीय पथक दुष्काळी पाहणी दौरा करून गेले. यानंतर तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला. सतत पाच वर्षापासुन तालुक्यात दुष्काळ असुन तो अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये आहे. ग्रामस्तरावर पिककापणी प्रयोग रद्द करून मंडळ स्तरावर कापणी प्रयोग करण्यात आले, कृषी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांच्या संगनमताने खोटे पिक कापणी प्रयोग करण्यात आले.

पिक कापणी प्रयोगात ग्रामसमितीच्या पंचांच्या साक्षी नाहीत. तसेच हा प्रयोग करतांना विमा कंपनी धार्जिणी भुमिका अधिका-यांनी घेतली. गावात पिक कापणी प्रयोग कधी, कुठे होणार ही माहिती शेतकयांना मिळाली नाही. उंबरठा उत्पादन जास्त दाखविण्यात आले. कृषी अधिकारी व महसूल खात्यातील कर्मचारी यांना हाताशी धरुन विमा कंपन्यांनी शेतक-यांचा पहारा चुकवुन खोटे व चुकीचे पिक कापणी प्रयोग घेण्यात आले. उदा. भरवस मंडळात बागायती पिक कापणी प्रयोग व वावडे मंडळात जिरायती पिक कापणी प्रयोग घेण्यात येवुन सरासरी पिक कापणी प्रयोग करण्यात आले. दरवर्षी तीन ते चार वेळेस पिक कापणी प्रयोग घेण्यात येत होते, यंदा मात्र एकदाच पिक कापणी प्रयोग घेण्यात आले, नदीच्या काठावरील सिंचीत क्षेत्रातील पुर्ण पाणी आहे, अश्याच ठिकाणी पिक कापणी प्रयोग घेण्यात आले. सन २०१७-१८ मध्ये शेतकरी प्रतिहेक्टरी पिक विमा १४२९ /- रु. भरत होते व हेक्टरी जोखीम ४०,०००/- रु. होती. सन २०१८-१९ मध्ये हेक्टरी पिक विमा शेतकयाने भरावयाची रक्कम ही १८०० /- करण्यात आली व विमा कंपन्यांची जोखीम फक्त ३६,००० रु. करण्यात आली. विमा कंपन्यांची नावे व विमा कंपन्यांचे संपर्क नंबर शेतक-यांना माहीत नाही. थेट दिल्लीचे संपर्क नंबर सामान्य शेतक-यांना देण्यात आले आहेत. अश्या रितीने विमा कंपनी धार्जिण्या सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला व हजारो कोटी रुपयांचा विमा कंपन्यांना फायदा केला जात आहे. त्याचप्रमाणे अमळनेर तालुक्यातील आठ मंडळांपैकी फक्त एकच मंडळाचा पिक विमा मंजूर करण्यात आला व तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय करण्यात आल्याने या अन्यायाविरुद्ध आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात शिवाजी पाटील, गावरानी जागल्या संघटनेचे अध्यक्ष विश्वास पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे खान्देश प्रभारी हिरालाल पाटील, गावरान जागल्या संघटनेचे कार्यकारी सदस्य अरुण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील, एल. टी. पाटील, मुक्तार खाटीक, संजय भिला पाटील, धनगर दला पाटील, नगराज पाटील, दिलीप पाटील, दिनेश साळुंखे, सुरेंद्र साळुंखे, वसंत पाटील, वसंत साळुंखे, भिकन पाटील, रामराव पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील, हिंमत पाटील, दरबारसिंग पाटील, किरण पाटील, दिलीप पाटील, रियाज बागवान, प्रकाश यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून या उपोषणात सहभागी झाले होते.
तसेच तालुका राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील व कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील हे कार्यकर्त्यांसह पाठींबा देण्यास उपस्थित होते.

Protected Content