‘त्या’ पत्रकाराची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली वृत्तसंस्था । युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अटकेत असणारे पत्रकार प्रशांत कनोजिया यांना त्वरीत मुक्त करण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

store advt

याबाबतचे वृत्त असे की, नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनोजिया यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये एक महिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना दिसत आहे. ती म्हणते की, तिने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे. कनोजिया यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कनोजिया यांना अटक करण्यात आली होती. या अटकेविरोधात प्रशांत यांची पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

यावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले. अशा स्वरुपाच्या आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणे चुकीचेच आहे, पण तुम्ही अटकेचे समर्थन करु शकता का?, असा सवाल न्यायालयाने विचारला. तसेच उत्तर प्रदेश सरकारने प्रशांत कनोजिया यांची तातडीने तुरुंगातून सुटका करावी, असे देखील कोर्टाने सांगितले. आम्ही पत्रकाराच्या मताशी सहमत नाही, पण एखाद्या व्यक्तीला यावरुन तुम्ही थेट तुरुंगात कसे टाकू शकता, असे देखील कोर्टाने योगी सरकारला विचारले. या निकालाने योगी सरकारला जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!