Home Cities अमळनेर जुन्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; होमगार्ड येताच हल्लेखोर पसार

जुन्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; होमगार्ड येताच हल्लेखोर पसार


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील बोरी नदीच्या पात्रात भरलेल्या यात्रेत जुन्या वादाची किनार असलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. यात्रेचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या तरुणांवर एका टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवला असून, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश गोविंद धनगर (वय २८, रा. पैलाड, अमळनेर) हे त्यांचे मित्र ज्ञानेश्वर यांच्यासोबत ११ मे रोजी रात्री १० वाजेच्या बोरी नदी पात्रातील यात्रेत आले होते. तेथील मोठ्या ‘ड्रॅगन’ पाळण्याजवळून जात असताना, जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी निखिल सुरेश पाटील, मयूर सुरेश पाटील, गणेश रमेश पाटील आणि खुशाल रामदास पाटील (सर्व रा. अमळनेर) यांनी त्यांना अडवले. सुरुवातीला शिवीगाळ करत आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रावर हल्ला चढवला.

या हल्ल्यादरम्यान निखिल पाटील याने आपल्याजवळील चाकू काढून ज्ञानेश्वरच्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगेश यांनी तो वार हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता, चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर लागून ते जखमी झाले. त्याच वेळी इतर आरोपींनी ज्ञानेश्वर आणि योगेश यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी निखिलने पुन्हा चाकूने ज्ञानेश्वरच्या गालावर वार करून गंभीर जखमी केले. यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात असलेले होमगार्ड धावत येत असल्याचे पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound