


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील यावल वन विभागाच्या पथकाने अवैध लाकूड व वनसंपत्ती तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे हरिपुरा राऊंडच्या गस्ती पथकाने जामुनझिरा ते कोरपावली रस्त्यावर छापा टाकून बांबूची बेकायदेशीर वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली आहे. या कारवाईत वाहनासह ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास वन विभागाचे हरिपुरा राऊंड स्टाफ जामुनझिरा ते कोरपावली रस्त्याने नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. त्यावेळी एक संशयित बोलेरो पिकअप (क्रमांक MH 06 BG 1259) भरधाव वेगाने येताना दिसून आली. वन कर्मचाऱ्यांनी शंका आल्याने चौकशीसाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वन कर्मचाऱ्यांना पाहताच वाहन चालक घाबरला आणि गाडी रस्त्यावरच सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष सदर वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यात विनापरवाना व अवैधपणे वाहून नेले जाणारे १८०० नग बांबू आढळून आले. जप्त केलेल्या बांबूची एकूण किंमत सुमारे ३४,००० रुपये असून, ३ लाख रुपये किमतीच्या बोलेरो पिकअप वाहनासह एकूण ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला आहे. हा संपूर्ण मुद्देमाल पावतीद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे सुरक्षित जमा करण्यात आला आहे.
या प्रकरणी वनरक्षक हरिपुरा यांनी प्राथमिक वनगुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास हरिपुराचे प्रभारी वनपाल एस. बी. इंडे करत आहेत. ही यशस्वी कारवाई यावल वन विभाग जळगावचे उप वनसंरक्षक सौरिष सहाय, यावल प्रा. व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक एस. ए. पाटील आणि यावल पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वनपाल एस. बी. इंडे, वनरक्षक श्रीमती एस. पी. भालेराव, वनरक्षक श्रीमती एस. एस. भोंगरे, वनरक्षक एस. बी. पाटणे, योगेश मुंडे आणि चेतन शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



