
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील इस्लामपुरा परिसरात प्रतिबंधित गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मदिना मशिदीजवळ २४ नोव्हेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ५५ किलो गोमांसासह विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कुरेशी सज्जाद खान युसुफ (वय २४, रा. इस्लामपुरा, जळगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधित गोमांसाची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गोपनीय माहिती यंत्रणा सतर्क ठेवून अवैध गोवंश वाहतूक तसेच प्रतिबंधित गोमांस विक्रीविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या पथकाला आवश्यक मार्गदर्शन केले होते.
दरम्यान, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत इस्लामपुरा परिसरातील मदिना मशिदीजवळ प्रतिबंधित गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीची दखल घेत त्यांनी तातडीने पोलीस पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला. या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पांढरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर यांच्यासह पोलीस अंमलदारांचा समावेश होता.
पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता एक इसम गोमांस विक्री करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव कुरेशी सज्जाद खान युसुफ (वय २४, रा. घर क्रमांक २१, इस्लामपुरा, जळगाव) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून विक्रीसाठी ठेवलेले ५५ किलो गोमांस जप्त केले. या गोमांसाची किंमत ११ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय चार लोखंडी सुरे, वजनकाटे, जुना फ्रिज, लोखंडी व लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड, मस्कुला, वजनाची मापे, मोठे ॲल्युमिनियमचे पातेले आणि चार स्टीलचे हंडे असा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. गोमांसासह जप्त केलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत १९ हजार ७५० रुपये असून, पंचनामा करून मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(ब), ५(क), ९ आणि ९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत विकास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पांढरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, शशिकांत पाटील, रबिंद्र इंधाटे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, पराग दुसाने, गजानन वाघ, निलेश घुगे, नवजित चौधरी व सतीश भारुळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



