Home Cities जळगाव गोकुळनंतर आता जळगाव जिल्हा बँकेवरही सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व?; सहकार क्षेत्रातील लोकशाही धोक्यात आल्याचा...

गोकुळनंतर आता जळगाव जिल्हा बँकेवरही सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व?; सहकार क्षेत्रातील लोकशाही धोक्यात आल्याचा सीजेपीचा गंभीर आरोप

0
2


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघानंतर आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही कथित राजकीय हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला जात असून, यावरून कॉकरॉच जनता पार्टीने (सीजेपी) सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. सहकारी संस्थांवर राजकीय नियंत्रण मिळविण्याचा डाव आखला जात आहे का, असा थेट सवाल सीजेपीचे महाराष्ट्र समन्वय समिती सदस्य सम्राट सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षानंतर जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. पाचोरा मतदारसंघातील उमेदवार सुमित किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी २ नोव्हेंबर रोजी नामंजूर केला होता. मात्र, त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी अपील मंजूर करत हा अर्ज वैध ठरवला. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांच्या एका सार्वजनिक वक्तव्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना सांगितले होते आणि नंतर तो अर्ज वैध करण्यासाठीही प्रयत्न केले, असे त्यांनी म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इतकेच नव्हे तर या प्रक्रियेत मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा उल्लेख या वक्तव्यात करण्यात आला आहे. या खुलाशामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले असून महायुतीतील वाद आता सार्वजनिक व्यासपीठावर पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज नेमक्या कोणत्या कारणांमुळे नामंजूर करण्यात आला आणि अपिलामध्ये हा निर्णय बदलण्यामागे कोणता कायदेशीर आधार होता, याबाबत निवडणूक प्रशासनाने पारदर्शकता बाळगणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, देशभरातील ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरूनही निवडणूक यंत्रणेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मतदारयादी तयार करण्यापासून ते सहकारी संस्थांच्या निवडणुकांपर्यंत प्रत्येक स्तरावर पारदर्शकता आणि निष्पक्षता टिकवून ठेवणे लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचे सीजेपीने स्पष्ट केले आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवर सीजेपी महाराष्ट्राचे समन्वय समिती सदस्य सम्राट सोनवणे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतील कथित राजकीय हस्तक्षेपाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांचे आदेश, पत्रव्यवहार आणि सर्व शासकीय अभिलेख सुरक्षित ठेवण्यात यावेत, तसेच येत्या २९ नोव्हेंबरच्या मतदानापूर्वी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण करावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोकुळ असो वा जळगाव जिल्हा बँक, या निवडणुका लोकशाही पद्धतीने होणार की सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आणि सहकारी संस्थांवर सभासदांचा अधिकार राहणार की राजकीय नेत्यांचा, असा सवाल सीजेपीने विचारला आहे.

Protected Content

Play sound