Home राजकीय बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक विजय 

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक विजय 


बारामती-वृत्तसेवा । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तब्बल २,१८,९३० मतांच्या आघाडीने त्यांनी विजय संपादन करत यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, या निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसोबतच बारामतीत पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीच्या निकालात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकत ऐतिहासिक विजय नोंदवला.

या निकालानंतर बारामतीच्या राजकीय भवितव्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः २०२९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून उमेदवार कोण असणार, तसेच पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत पाहायला मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना देशातील रेकॉर्डब्रेक विजय मिळवून दिला आहे. हा विजय बारामतीतील जनतेचा त्यांच्या कुटुंबावर असलेल्या विश्वासाचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र काही नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना माघार घेऊ नये यासाठी दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित व्यक्तींविषयी योग्य वेळी माहिती उघड करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०२९ च्या निवडणुकीसंदर्भात बोलताना उमेश पाटील म्हणाले की, पुढील निवडणुकीस अजून साडेतीन वर्षांचा कालावधी शिल्लक असून, उमेदवारीबाबतचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे. त्यामुळे आताच कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य नाही. ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होईल की नाही, याबाबत विविध मते व्यक्त होत असली तरी भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, देशातील इतर राज्यांमध्येही विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपने बहुमताकडे वाटचाल केल्याचे चित्र दिसत आहे. केरळमध्ये मात्र राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असून, काँग्रेसने डाव्या पक्षांना मोठा धक्का देत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.


Protected Content

Play sound