पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, पाचोरा येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळाच्या वतीने या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. ४ मे रोजी प्रशासनाला निवेदन देत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनात उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे तसेच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना संबोधित करत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदनाद्वारे आरोपीविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यास कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना समाजातील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असून, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने अशा घटनांवर आळा घालण्यासाठी ठोस आणि कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. विशेषतः लहान मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
निवेदन देताना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेविरोधात समाजातील विविध स्तरातून संताप व्यक्त होत असून, दोषींना कडक शिक्षा मिळावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.



