अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जाहीर झालेल्या नाशिक विभागस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पारोळा तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत ५० लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला आहे. तर चोपडा तालुक्यातील अडावद ग्रामपंचायतीने द्वितीय आणि यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे ३० लाख आणि २० लाख रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविणे, ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांना प्रोत्साहन देणे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करणे, या उद्देशाने राज्य शासनाने सन २०२५-२६ पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ असा निश्चित करण्यात आला होता. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्यस्तरावर स्वतंत्र मूल्यमापन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. सहभागी ग्रामपंचायतींचे प्रथम तालुकास्तरावर मूल्यमापन करण्यात आले. त्यातून प्रत्येक तालुक्यातील दोन उत्कृष्ट ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली.

त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने केलेल्या मूल्यमापनातून प्रत्येक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींची विभागस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली. विभागस्तरीय समितीने संबंधित ग्रामपंचायतींच्या कामगिरीची तपासणी करून गुणांकन निश्चित केले. या प्रक्रियेनंतर प्रत्येक महसूल विभागातून दोन ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली. विविध स्तरांवरील मूल्यमापनात प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे पुरस्कारासाठी पात्र ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरील पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचा कनिष्ठ स्तरावरील पुरस्कारासाठी विचार न करता पुढील पात्र ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
६ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याच्या तीन ग्रामपंचायतींनी पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. यात देवगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवत ५० लाख रुपयांचा मान पटकावला. अडावद ग्रामपंचायतीने ३० लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार, तर साकळी ग्रामपंचायतीने २० लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार मिळवला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील या यशामुळे पारोळा, चोपडा आणि यावल तालुक्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या कामगिरीला विभागस्तरावर गौरव मिळाला आहे.



